---Advertisement---

‘पुष्पा’ शैलीची गरज नाही; शिवसेना कधीच झुकलेली नाही : उदय सामंतांचा विरोधकांवर टोला !

By team
On: March 14, 2026 7:27 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात लोकप्रिय ठरलेल्या पुष्पा चित्रपटातील “झुकेगा नहीं” हा संवाद सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असतानाच या संवादाची छाया आता राजकीय वर्तुळातही दिसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार टोला लगावत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. राजकारणात पुष्पासारखी शैली दाखवण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही, असे ठाम विधान त्यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना सामंत यांनी शिवसेनेच्या राजकीय परंपरेवर प्रकाश टाकत विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

सामंत म्हणाले की, सध्या सर्वत्र पुष्पा चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अनेक जण “झुकेगा नहीं” हा संवाद आणि अभिनेता अल्लू अर्जुनची हनुवटीवर हात फिरवण्याची शैली नक्कल करताना दिसतात. मात्र शिवसेनेला अशा चित्रपटातील संवादांची गरज नाही. शिवसेना ही संघर्षातून उभी राहिलेली संघटना आहे आणि ती कधीही कोणासमोर झुकलेली नाही. त्यामुळे आम्ही चित्रपटातील संवादांपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या ठेवींबाबत स्पष्टीकरण
यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतही माहिती दिली. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या ठेवी सुमारे ९१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर शहरात विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. त्यामुळे २०२५ पर्यंत या ठेवी कमी होऊन सुमारे ७९ हजार ४९८ कोटी रुपयांवर आल्या.

मात्र यावर्षी पुन्हा सुमारे दीड हजार कोटी रुपयांची वाढ होऊन महापालिकेच्या ठेवी ८१ हजार १३४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेली टीका वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगत सामंत यांनी आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले.

गॅस पुरवठ्यामुळे उद्योगांवर परिणाम
राज्यात एलपीजी, सीएनजी तसेच उद्योगांसाठी लागणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यात काही अडथळे निर्माण झाल्याचेही त्यांनी मान्य केले. यामुळे काही औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांना अडचणी निर्माण होत असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून उद्योगांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग बंद पडू देणार नाही, असे आश्वासन देताना सामंत म्हणाले की, उद्योजकांच्या समस्या आणि अडचणींचा सविस्तर अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. सरकार उद्योगांना आवश्यक मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध स्तरांवरील नव्याने निवडून आलेले सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!