ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; तीन ठार, चार गंभीर – वाहनांचा चक्काचूर !

करजखेडा पाटीजवळ वेगामुळे नियंत्रण सुटले; बोलेरो पलटी होऊन दुभाजक ओलांडत होंडा सिटीला धडक

धाराशीव : वृत्तसंस्था 

धाराशिव–लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी भीषण तिहेरी अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. करजखेडा पाटीजवळ बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन कार एकमेकांवर आदळल्याने हा थरारक अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून महामार्गावर रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडी अतिवेगाने धावत होती. करजखेडा पाटीजवळ आली असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बोलेरोने समोरील वॅगनार कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बोलेरो पलटी झाली आणि दुभाजक ओलांडून पलीकडील लेनमध्ये गेली.

दरम्यान, समोरून येणारी होंडा सिटी कार बोलेरोवर जोरात आदळल्याने तिहेरी अपघात झाला. या भीषण धडकेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. अपघातातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धाराशिव आणि सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात मदत करण्यात आली. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. नंतर महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!