---Advertisement---

अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने राज्यातील शेतकरी चिंतेत !

By team
On: March 19, 2026 3:59 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती पिकांना बसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विशेषतः फळबाग उत्पादक शेतकरी द्राक्ष, आंबा, काजू आणि केळी यांसारख्या नगदी पिकांच्या अतोनात नुकसानीची भीती व्यक्त करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहरात दुपारी अचानक ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आला. या गारपिटीमुळे शहरात घरांच्या छतावर आणि रस्त्यांवर पांढराशुभ्र थर साचला, तर नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आलेल्या या अचानक गारपिटीमुळे वातावरण तात्पुरते गार झाले असले तरी शेती आणि फळबागांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीची भीती अधिक वाढली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी आणि गिरवी परिसरात संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. अर्धा तास चाललेल्या या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांसह धुमाळवाडीतील डाळिंब बागा आणि आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला असून, सटाणा तालुक्यातील ताहाराबाद, मुल्हेर आणि अंतापूर परिसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि धावपळ उडाली आहे, तर संपूर्ण परिसरात दाणादाण उडाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. अवकाळी गारपीटामुळे शेतकरी आणि फळबाग उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असून, तातडीने नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडून उपाययोजना अपेक्षित आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!