मुंबई, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची एनडीएमध्ये सहभागी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या चर्चांदरम्यान आता भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ‘जर कोणी आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू’, असं म्हणत त्यांनी या चर्चांना नवी दिशा दिली आहे.
विकसित भारताच्या संकल्पनेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी कोणी पुढे येत असेल, तर त्यांचं स्वागतच करू, असं बावनकुळे म्हणाले. आम्ही आमच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतो, त्यामुळे देशाच्या विकासासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांचं स्वागत करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या एनडीएमधील संभाव्य सहभागाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.
डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर बोलताना बावनकुळे यांनी त्याला समर्थन दर्शवलं. मतदारसंघ जितका छोटा असेल, तितकं लोकप्रतिनिधींना अधिक प्रभावीपणे काम करता येईल. डिलिमिटेशन झालं पाहिजे, ही सर्वांची इच्छा असून राज्य आणि देशाच्या दृष्टीनेही त्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दर महिन्याला प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य देण्याच्या सरकारच्या निर्णयावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यातील जलसाठे, पिकांची स्थिती आणि दुष्काळी परिस्थिती यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.









