मुंबई: शेअर मार्केटमध्ये तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे ओघ वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला आणि 51350 अंकांवर गेला. काल तांत्रिक बिघाड झाल्याने निफ्टीचे व्यवहार जवळपास तीन तासांहून अधिक काळ खंडीत झाले होते. सारवलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 180 अंकांनी वाढ झाली आहे. निफ्टी 15167 अंकावर गेला आहे. सलग तिसर्या दिवशी शेअर मार्केटमध्ये पॉझिटीव्ह वातावरण आहे. उद्या शुक्रवारी केंद्र सरकारकडून तिसर्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. यात विकासदर वाढणार की कमी होणार? याकडे लक्ष लागले आहे. विकासदर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वित्त संस्था, बँका, ऊर्जा, पायाभूत सेवा, स्थावर मालमत्ता, एफएमसीजी, आयटी सेवा कंपन्या या क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे. आजच्या सत्रात एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, टीसीएस या शेअरमध्ये वाढ झाली आहे. निफ्टी मंचावर देखील तेजीचा बोलबाला आहे. निफ्टीवरील सर्वच 11 क्षेत्रात खरेदी सुरु आहे. ज्यात मेटल इंडेक्समध्ये 2.5 टक्के वाढ झाली आहे. त्याशिवाय निफ्टी पीएसयू बँक, फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयटी, रियल्टी या निर्देशांकात 1 ते 2 टक्के वाढ झाली आहे.
निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकात 1 टक्का वाढ झाली आहे. निफ्टीवर हिंदाल्कोच्या शेअरमध्ये सर्वाधिक 4 टक्के वाढ झाली आहे. त्याशिवाय इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, युपीएल, एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील, बीपीसीएल आणि जेएसडब्ल्यू स्टील या शेअरमध्ये 2 ते 3 टक्के वाढ झाली आहे.