ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गणेश माने देशमुख या अभ्यासू,विनयशील, प्रामाणिक आणि सुसंस्कृत युवक नेतृत्वाचा आज काँग्रेस प्रवेश !

मुंबई दि. १७ मार्च :गणेश माने देशमुख यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार हुसेन दलवाई, नामदार नसीम सिद्दीकी, आमदार प्रणिती शिंदे,सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश केला. गणेश माने देशमुख यांच्या राजकीय जीवनाची ही आजपासून सुरुवात झालेली आहे.

गणेश माने देशमुख हे अत्यंत सुखवस्तू कुटुंबातून पुढे आलेले आहेत.त्यांना वाडवडिलांच्या जसा संपत्तीचा वारसा लाभलेला आहे, तसाच सुसंस्कृतपणाचा, ज्ञानाचा,कर्तृत्वाचा, प्रामाणिकपणाचा, कष्टाचा, विनयशीलतेचा देखील वारसा लाभलेला आहे. आपण मोठ्या घराण्यातून आल्याचा त्यांना बडेजाव नाही, अहंकार नाही, गर्व तर नाहीच नाही. त्यांच्याजवळ प्रचंड नम्रता आहे.

ते स्वतः एक नामवंत उद्योजक आहेत. एक नामवंत साखर कारखानदार आहेत. काटा न मारता शेतकऱ्यांच्या उसाला योग्य आणि वेळच्यावेळी भाव देण्यामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. जोडोनिया धन। उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी। या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे योग्य मार्गाने पैसा कमवून श्रीमंत व्हावे, पण धनसंपत्तीची घमेंड न बाळगता, त्या धनसंपत्तीचा योग्य विनियोग करावा, या विचाराचे गणेश माने बापू आहेत.

गणेश माने बापू हे लहानपणापासूनच जिज्ञासू प्रवृत्तीचे आहेत. त्यांचा अनेक विषयाचा दांडगा व्यासंग आहे. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान, प्राच्यविद्या, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, घडामोडी या विषयावरती त्यांचे कमालीचे प्रभुत्व आहे. ते एकपाठी आहेत. एखादा विषय समजून घेण्यासाठी त्यांचा मोठा ध्यास असतो. मार्क्सवादापासून ते वेद वाङमयापर्यंत त्यांचा दांडगा व्यासंग आहे. ते एकदा बोलायला लागले की त्यांची विद्वत्ता ओसंडून वाहते. पण याचा कोठेही यत्किंचितही अहंकार त्यांच्या ठाई नाही. “विद्या विनयेन शोभते” या विचारावरती त्यांची नितांत निष्ठा आहे.

गणेश माने बापू हे स्वतः कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे (सीओईपी) चे विद्यार्थी आहेत. हे एक जगविख्यात शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे. एक दूरदृष्टी असलेले हे युवक नेते आहेत. त्यांची एक वैचारिक बैठक आहे. सर्वांना सतत मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सतत विधायक कामात राहणे हा त्यांचा पिंड आहे. ते अत्यंत नीतिमान आणि निर्व्यसनी युवक नेते आहेत. आपल्यापेक्षा लहान व्यक्तींचा देखील आदर करणे, वडीलधारे यांच्या आज्ञेत राहणे, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. अशा एका अभ्यासू, विनयशील, कर्तृत्ववान, उद्योजक युवक नेत्याने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला, निशितच गणेश माने बापू यांना उत्तम राजकीय भवितव्य आहे.

काँग्रेस पक्ष हा ऐतिहासिक वारसा असणारा राष्ट्रीय पक्ष आहे. सर्व समाज घटकांना सामावून घेणे हे कॉंग्रेसचे वैशिष्ट्य आहे. या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिले. अनेक महान नेते दिले. मोठा वारसा या पक्षाला आहे. आज महाराष्ट्रामध्ये नानाभाऊ पटोले सारखे स्वाभिमानी, निर्भीड, कणखर अध्यक्ष लाभलेले आहेत. गणेश माने देशमुख यांच्यासारखे युवक पक्षासाठी निश्चितपणे भरीव कामगिरी करतील.

गणेश माने बापू आमचे अनेक वर्षापासूनचे जिवलग मित्र आहेत. अनेक कठीण प्रसंगी, सुखदुःखात ते पाठीशी खंबीरपणे उभे असतात. त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला, ही खूप आनंददायी बाब आहे, कारण चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत. राजकारण कधीही वाईट नसते, फक्त चांगल्या लोकांची राजकारणाला नितांत गरज असते. गणेश माने देशमुख यांना भावी राजकीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा !
डॉ. श्रीमंत शिवाजी कोकाटे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!