मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२९ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने केवळ दोन महिन्यात मालवाहतूकीतून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे प्रवासी वाहतूक बंद अशा दुहेरी संकटात एसटी असताना व्यवस्थापनास याची मोठी मदत होणार आहे.सोलापूर विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मालवाहतूक अर्थात महाकार्गोद्वारे सोलापूर जिल्ह्याने या आर्थिक वर्षात चांगली प्रगती केली आहे.कोरोना टाळेबंदीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सध्या पूर्णपणे बंद आहे.अशा परिस्थितीत उत्पन्नाचा मार्ग नव्हता.त्यामुळे शासनाच्या परवानगीने मालवाहतुकीची परवानगी देण्यात आलेली होती.सोलापूर विभागाने या काळात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करून १ एप्रिल २०२१ ते २७ मे २०२१ या काळात १ कोटी २ लाखाचे उत्पन्न प्राप्त केले आहे.
महाराष्ट्रात मालवाहतुकीतच सोलापूर विभाग प्रथम ठरला आहे.यामध्ये प्रामुख्याने सिमेंट, अन्नधान्य, चिंच, शेतीमाल व इतर मालाची वाहतूक याद्वारे केली गेली आहे,अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी तथा विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली आहे. दरम्यान सातत्याने होत असलेला लॉकडाऊन आणि प्रवाशांचा अभाव यामुळे एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस घसरत चालली आहे. अशा स्थितीमध्ये मालवाहतूक करून एसटीला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यामार्फत सुरू आहे.त्याला यश देखील येत आहे.
तरी गरजूंनी मालवाहतुकीसाठी जवळच्या आगाराशी संपर्क साधावा.मालवाहतूक दर सर्वसामान्यांना परवडणारे असल्याने शेतकरी व उद्योजक तसेच व्यावसायिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळाने केले आहे.
★ महामंडळाला उर्जितावस्था
गेल्या काही दिवसांपासून एसटीची
प्रवासी वाहतूक बंद आहे.या पार्श्वभूमीवर कामगारांमध्ये मोठी अस्वस्थता दिसत होती. परंतु मालवाहतूकीतून उत्पन्न मिळत असल्याने महामंडळाच्या कामकाजाला ऊर्जितावस्था मिळणार आहे.