धाब्यावर दारु पिणे पडले महागात हॉटेल मालक व 4 मद्यपींविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयाने ठोठावला 29 हजारांचा दंड
साेलापुर : राज्य उत्पादन शुल्क ब 2 विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांनी त्यांच्या पथकासह 14 नोव्हेंबर रोजी अक्क्लकोट – हन्नूर रोडवरील चपळगाव गावाच्या हद्दीतील होटेल रॉयल धाबा येथे छापा टाकला असता हॉटेल मालक अबुजर मैनुद्दीन पटेल, वय 53 वर्षे व त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेले 4 मद्यपी ग्राहक नामे गौरीशंकर बसवनप्पा बळुरगे (वय 42 वर्षे), शिवशरण शिवपुत्र अचलेरे (वय 36 वर्षे), संदिप राजेंद्र गजधाने (वय 22 वर्षे) व सिद्धराम बाबुराव वाले (वय 32 वर्षे) सर्व राहणार चपळगाव ता. अक्कलकोट यांना अटक करुन ताब्यात घेतले होते. अटक आरोपींच्या ताब्यातून इंपेरियल ब्ल्यू व्हिस्किच्या 180 मिली क्षमतेच्या 10 बाटल्या व चार काचेचे ग्लास असा एक हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) व 84 नुसार गुन्हा दाखल करुन तपास अधिकारी यांनी 15 नोव्हेंबर रोजी गुन्ह्याचे आरोपपत्र मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अक्कलकोट न्यायालयात दाखल केले असता मा. न्यायालयाने त्यांच्या 21 नोव्हेंबरच्या आदेशान्वये हॉटेल मालकास 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार याप्रमाणे 29 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण व विभागीय उप-आयुक्त, पुणे अनिल चासकर यांचे आदेशान्वये व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, सुनिल कदम, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, सुरेश झगडे, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर व जवान ईस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशिद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर महिन्यापासून अवैधरीत्या दारु पिण्याची व्यवस्था ग्राहकांना उपलब्ध करुन देणा-या धाबे व होटेलवर धडक मोहीम राबविली असून मागील दोन महिन्यात विभागाकडून 7 धाब्यांवर कारवाई करण्यात आली असून एकूण 43 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मा. न्यायालयाकडून धाबा मालक /चालक व मद्यपी ग्राहकांना एकूण दोन लाख 58 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आवाहन
धाब्यावर दारु विक्री करणे तसेच धाब्यावर बसून दारु पिणे हे कायद्याने गुन्हा असून याविरोधात या विभागाकडून धाबे होटेलवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून धाबे मालक व मद्यपींवर गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अवैध दारु विरोधात तक्रारींकरीता या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.