बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापले असून आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच या प्रकरणात संशयास्पद भूमिका बजावणाऱ्या वाशी पोलिस स्टेशनच्या पोलिसांचे सीडीआर तपासण्यात यावे, अशीही मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी भेट देत माध्यमांशी संवाद साधला. सुरेश धस म्हणाले, महादेव मुंडेचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा हाच महाजन त्यावेळी तिथे होता. हाच महाजन जालना येथे देखील एका केसमध्ये सस्पेंड झाला आहे. महाजन हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याचे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसोबत उठबस आहे. राजेश पाटील देखील तसाच आहे. जर आमच्या संतोष अण्णांचा मृतदेह केजकडे आणायच्या ऐवजी कळंबकडे नेत असेल तर तो कोणाच्या बाजूचा माणूस आहे हे समजते. त्यामुळे हे दोघेही सस्पेंड व्हावे आणि सहआरोपी व्हावेत.
सुरेश धस म्हणाले, गेले दोन दिवस जो त्रागा, जो त्रास सहन करावा लागला आहे येथील ग्रामस्थांना व देशमुख कुटुंबीयांना ते मी समजू शकतो आणि मान्य करतो. परंतु मी एक गोष्ट सांगू इच्छितो ग्रामस्थांना की राज्याचे मुख्यमंत्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात इमानदारीने तपास करत आहेत. हे क्लेशकारक जे आंदोलन तुम्ही केले आहे, ते पुन्हा करण्याची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही, असे आश्वासन सुरेश धस यांनी दिले आहे.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारायला नेले होते त्या ठिकाणी डॉक्टर वायभासे, सुदर्शन घुले या आरोपीकडून हा डॉक्टर मुकादमीचे धंदे करतो, त्याचे पैसे कोणाकडे तरी अडकले होते ते वसूल करण्यासाठी सुदर्शन घुले सारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ज्या ठिकाणी मारायला नेत होता, त्याच ठिकाणी संतोष देशमुख यांना नेण्यात आले होते. म्हणून डॉ. वायभासे आणि हे जे काही फिरवण्यात आले आहे संतोष देशमुख यांना या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील दिले आहे.