बीड : वृत्तसंस्था
गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्हा खुनाच्या घटनेने देशभर चर्चेत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या PA ने एका शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 12 डिसेंबरचा आहे. पण तो आता व्हायरल झाला आहे. यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता संदीप क्षीरसागरही अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील कथित गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या दोघांवरही भाजप आमदार सुरेश धस यांनी आका व आकाचे आका म्हणत टीका केली होती. त्यानंतर सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या मारहाणीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. यामुळे सुरेश धस स्वतःच आका आहेत का? असा सवाल उपस्थित केला जावू लागला. या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांच्या पीएने आपल्या कार्यकर्त्यांसह शोरूमच्या सेल्स मॅनेजरला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
संदीप क्षीरसागर यांचे खासगी पीए सतीश शेळके यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ 12 डिसेंबर 2024 रोजीचा आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सतीश शेळके हे आपल्या सहकाऱ्यांसह बीड येथील एका कारच्या शोरूममध्ये गेले होते. त्यांना कार घ्यायची होती. यावेळी तेथील एक सेल्स मॅनेजरने त्यांच्याशी कथितपणे उद्धट वर्तन केले. यामुळे शेळके यांना राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्या सेल्समॅनेजरला मारहाण केली. जवळपास साडेतीन मिनिटांच्या या व्हिडिओत शोरूम मॅनेजर सतीश शेळके यांची माफी मागतानाही दिसून येत आहे.
दुसरीकडे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी या व्हिडिओतील मारहाण करणारी माणसे आपली नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओत मारहाण करताना दिसून येणारी लोकं माझे नाहीत. ते लोक मारायला गेले होते की वाचवायला हे पहावे लागेल. पण व्हिडिओतील कार्यकर्ता माझा नाही. हा जुना व्हिडिओ आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती बोकाळल्यामुळे बीडच्या मुलांना दुसऱ्या शहरांत भाड्याने खोली मिळणे अवघड झाले आहे, असे ते म्हणालेत.