ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.राणांचा मोठा दावा : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येवून ठेपला असल्याने सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी एक मोठा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याची चर्चा राज्यात जोर धरू लागली आहे.

आ.राणा म्हणाले कि, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील 15 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी होतील, असा त्यांच्या या दाव्यामुळे लोकसभा निवडणूक निकालाच्या ऐन तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या मंगळवारी जाहीर होणार आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये देशात सलग तिसऱ्यांदा सत्ताधारी एनडीएचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोबीपछाड देण्याच्या विचारात असणाऱ्या काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एनडीएत येणार असल्याचा दावा केला आहे. काही एक्झिट पोलमध्ये लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 14 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केले. त्यामुळे ते पुढील 15 दिवसांतच मोदींसोबत परत येतील, त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, येणारा काळ नरेंद्र मोदींचा आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा एनडीएसोबत येतील, असे ते म्हणाले. रवी राणा यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर आपले मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एकत्र येतील यावर मी भाष्य करणार नाही. पण उद्धव ठाकरेंनी मोदींकडे वेळ मागितल्याचे खरे आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!