मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी शिंदेंनी पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यावेळी शिंदे हे त्यांच्या मूळ गावी होते. त्यानंतर सोमवारी शिंदे शहाजीबापू यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले.
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर शिंदे यांनी फोनवरून शहाजीबापू पाटील यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज रुग्णालय गाठून शिंदेंनी डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली आहे. तसेच त्यांनी लवकरात लवकर त्यांनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. शिंदेंनी शहाजीबापू यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कुटूंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे हेदेखील यावेळी उपस्थित होते.