धर्म, नीती,संस्काराचे पालन करणारे अनोखे अलगुडगाव
विणापरंपरेला शंभर वर्षे पूर्ण; यंदाची नाथषष्ठी ठरणार लक्षवेधी
अक्कलकोट : मारुती बावडे
आजकाल कोणासाठी काही करण्यास वेळ नाही अशा परिस्थितीमध्ये बसवकल्याण तालुक्यातील अलगुड येथे गेल्या शंभर वर्षांपासून अखंड विना वाजवण्याची परंपरा सुरू आहे. या परंपरेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असून अशा प्रकारची प्रथा आणि परंपरा सुरू ठेवणारे एकमेव गाव असेल,अशी चर्चा सध्या सुरू आहे.
एका गावात, एखादा प्रासंगिक कार्यक्रम घेणे,एखादे प्रवचन ठेवणे किंवा एखादे कीर्तन करणे किंवा सात दिवसाचा सप्ताह ठेवणे यापलीकडे अध्यात्मामध्ये कार्यक्रम होत नाहीत परंतु गेली शंभर वर्ष अखंड पणे गावकऱ्यांनी ही परंपरा सुरू ठेवल्याने अध्यात्मिक क्षेत्रात या गावाचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. त्यांच्या या अनोख्या परंपरेबद्दल सर्वत्र कौतुक देखील करण्यात येत आहे.बसवकल्याणपासून २४ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.मूळ औसा संस्थानच्या देखरेखी खाली असलेल्या या गावावर १९२४ च्या दरम्यान आरोग्य आणि पाण्याच्या बाबतीत खूप मोठी आपत्ती कोसळली होती.त्यावेळी गावकऱ्यांना काही सुचत नव्हते म्हणून हे संकट परमेश्वराने दूर करावे यासाठी गावकऱ्यांनी ही परंपरा सुरू केली आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी ती आजतागायत सुरू ठेवली हे देखील विशेष आहे.
खरे तर अध्यात्माशिवाय जगात शांती नाही असे म्हटले जाते.अगदी त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अलगुड गावाकडे पाहावे लागेल.मंठाळ ते गुलबर्गा रोडवर असलेले हे छोटेसे गाव साधारण ४ ते ५ हजार लोकवस्तीचे आहे.पण हे गाव कधीही जावा त्याठिकाणी नाम जप आणि अध्यात्म या विषयात बुडाल्याचे चित्र दिसून येते.या गावाच्या इतिहासावर जर एक नजर टाकली तर असे सांगितले जाते की,सद्गुरू विरनाथ महाराज हे १८६४ च्याही पूर्वी पहिल्यांदा ज्यावेळी अलगुडला आले.त्यावेळी नाथांची स्थापना गावात व्हावी,असा विचार त्यांनी ग्रामस्थांसमोर मांडला होता.त्याचवेळी सद्गुरू मल्लनाथ महाराजांनी गावात येऊन नाथांची स्थापना केली.पुढे सद्गुरू दास विरनाथ महाराजांनी १९२४ साली दसऱ्या दिवशी अखंड विण्याची परंपरा सुरू केली.आजही चोवीस तास मंदिराला विण्याचा पहारा आहे.एक नाही दोन नाही.तब्बल १०० वर्ष झाली ही परंपरा अखंड सुरू ठेवणे हा जोक नाही.त्यानंतर पुन्हा १९७७ साली याच मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीची स्थापना सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकर यांच्या हस्ते सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांनी केली.पुढे सद्गुरू ह.भ.प गुरुबाबाऔसेकर महाराज आणि ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिराचे जीर्णोद्धार,मंगल कार्यालय आणि नाथ मंडपाचे काम पूर्ण केले.ही परंपरा सुरू होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारत स्वातंत्र्यापूर्वी एकदा गावात खूप मोठ्या प्रमाणात साथीचा रोग पसरला होता.त्यात अनेकांचे प्राण गेले होते.त्यामुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी दास विरनाथ महाराजांना यावर उपाय करण्यास सांगितले होते.त्यावेळी अखंड वीणा परंपरा सुरू करण्याचा संदेश त्यांनी दिला होता.त्यानंतर गावातील साथ आटोक्यात आली.तेव्हापासून ही परंपरा चालू आहे,असे गावकरी सांगतात.
नागझरा ओढ्याचे वैशिष्ट्य
दर बारा वर्षाला औसा संस्थानकडून महोत्सव भरविला जातो.या माध्यमातून धर्म जागृती आणि नाथ परंपरा जोपासली जाते.हा महोत्सव १९७७ साली या गावात भरला होता.त्यावेळी गावात अजिबातच पाणी नव्हते.ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळी ओढ्यात जाऊन दिंडीसह एका गुंडग्याची पूजा केली होती.तेव्हांपासून या ओढ्याला पाणी आले,असे गावकरी सांगतात.म्हणून त्या ओढ्याला गझरा ओढा म्हटले जाते.हे देखील एक वेगळे वैशिष्ट्य सांगता येईल.
अलगुड गावाकडून धर्म,निती संस्काराचे पालन
आलगुड हे गाव नेहमी औसा संस्थांनाला जवळचे वाटते.त्याचे कारण म्हणजे ग्रामस्थांकडून नेहमी धर्म,नीती,संस्कार आणि आचार याचे पालन होत आले आहे.कुठलाही कार्यक्रम असो गावकरी एकत्र येऊन साजरे करतात.गाव कर्नाटकात असले तरी विण्याची परंपरा त्यांनी मोठ्या प्रयत्नाने सुरू ठेवली आहे.यावर्षी देखील त्या ठिकाणी नाथ षष्ठी मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे.
सद्गुरू ह.भ.प गहिनीनाथ महाराज,औसेकर
आध्यात्मात मानसिक समाधान
आजकाल माणसाकडे किती पैसा असू देत, समाधानी नाही. समाधानाची साधने किती असले तरी अध्यात्मात जेवढे समाधान आहे. ते कशातच नाही त्यामुळे मी गेल्या अनेक वर्षापासून विना हाती धरत आहे याचे वेगळे समाधान माझ्या जीवनात मला लाभले आहे.वीणा धरणारे आम्ही चार जण आहेत.प्रत्येकाची वेळ ठरली आहे.
पांडुरंग परांडे,विणा धारक
यंदा बारावा महोत्सव अलगुडच्या नाथ मंदिराला खूप मोठी परंपरा आहे.दर बारा वर्षांनी आम्ही मोठा महोत्सव घेतो.दरवर्षी तर कार्यक्रम होतच असतात.यावर्षी बारावा महोत्सव आहे. यावर्षी जगद्गुरुंच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सर्व गावकरी एकत्रित मिळून हा उत्सव साजरा करतो.
श्रीकांत पाटील,सचिव श्री एकनाथ महाराज संस्थान आलगुड