लातूर : वृत्तसंस्था
केवळ आश्वासनांवर देशाचा कारभार सुरू राहत नाही. त्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते. गेल्या १० वर्षांमध्ये आश्वासनांपलीकडे जनतेला काहीच मिळाले नाही. त्यामुळे प्रचंड नाराजी असून राज्यात परिवर्तनाची लाट असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मतदारसंघात प्रचार सभा घेतल्यानंतर त्यांची लातुरात बुधवारी पत्रकार परिषद पार पडली.
सत्तेत येण्यापूर्वी भाजपने एक ना अनेक आश्वासने दिली होती. जनतेनेही भरभरून दिले असताना या सरकारला सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा विसर पडला. उद्योजक आणि व्यावसायिक यांनाच केंद्रस्थानी ठेवून कारभार सुरू असल्याने मोठा वर्ग नाराज आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून विकासाबाबत मतभेद केले जात आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे कमी बोलत होते, पण देशहितासाठी अधिक काम करीत होते. पंतप्रधान हा सर्व देशाचा असतो, पण मोदी हे केवळ गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे झाले आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा… असे म्हणणाऱ्या भाजप सरकारने कमिशनखोर व्यवस्था व्यवहारात आणली आहे. त्यामुळे प्रत्येक कामात कमिशन घेतले जात आहे. पक्षात राहून सक्रियपणे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची टक्केवारी आणि तरुणांचा काँग्रेसकडे वाढलेला कल यामुळे राज्यात सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.