ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने संपविले आयुष्य

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर परिसरात मंगळवारी २० फेब्रुवारी घडली. लिना श्रीराम पाटील असं मृत तरुणीचं नाव आहे. लिना गरुडझेप अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करत होती.

मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वसतीगृहाच्या बाथमरूममध्ये तिचा मृतदेह आढळून आला. लिनाने इतकंच टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिना श्रीराम पाटील मूळ सावखेडा (ता. पाचोड, जि. जळगाव) गावची रहिवासी होती. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी लिना छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती. लिनाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी तिचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. डिसेंबर महिन्यात देखील गरुडझेप अॅकडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. श्रीकांत दशरथ वाघ (वय १९) असं या तरुणाचं नाव होतं. धक्कादायक बाब म्हणजे श्रीकांतचाही मृतदेह हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. श्रीकांतनंतर आता लिनाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने गरुडझेप अॅकडमीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!