सोलापूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप -2023 हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6 लाख 76 हजार 311 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 177 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा कंपनीकडे विमा भरलेला होता. खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना निर्मित करून 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत पिक विमा कंपनीस आदेशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावाला यश येऊन विमा कंपनीने बाजरी, मका व सोयाबीन पिकासाठी 1 लाख 90 हजार 458 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 113 कोटी 82 लाख रुपयांचा निधी थेट जमा केला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.
ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी 25 टक्के अग्रीम म्हणून वाटप केलेला निधी व शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे….
1. अक्कलकोट -21 हजार 885 शेतकऱ्यांना 12 कोटी 49 लाख 85 हजार, 2. बार्शी- 88 हजार 402 शेतकऱ्यांना 59 कोटी 32 लाख 32 हजार, 3. करमाळा- 5959 शेतकऱ्यांना 86 लाख 84 हजार, 4. माढा- 2671 शेतकऱ्यांना 27 लाख 28 हजार, 5. माळशिरस- आठ हजार 91 शेतकऱ्यांना एक कोटी 62 लाख 26 हजार, 6. मंगळवेढा दहा हजार एकशे सहा शेतकऱ्यांना 26 कोटी 9 लाख 11 हजार, 7. मोहोळ- 11 हजार 741 शेतकऱ्यांना 7 कोटी 8 लाख 31 हजार, 8. पंढरपूर- 821 शेतकऱ्यांना 8 लाख 80 हजार, 9. सांगोला- 14 हजार 248 शेतकऱ्यांना 4 कोटी 37 लाख 21 हजार, 10. सोलापूर उत्तर- 15 हजार 627 शेतकऱ्यांना 13 कोटी 86 लाख 88 हजार व सोलापूर दक्षिण दहाच्या 979 शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख 82 हजार असे एकूण 1 लाख 90 हजार 458 शेतकऱ्यांना 113 कोटी 82 लाख 38 हजाराचा निधी विमा कंपनीकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला, अशी माहिती श्री. गावसाने यांनी दिली.
*नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांना निधी वाटप कारवाही सुरू-
तसेच जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने 65 हजार 918 शेतकऱ्यांनी पुर्व सुचना दिल्या होत्या. त्यापैकी 59 हजार 110 शेतकऱ्यांचे पंचनामे पुर्ण करून त्यापैकी 25 हजार 954 पात्र शेतकऱ्यांना रक्कम रुपये 24.95 कोटी निधी वितरीत करण्याची कार्यवाही पिक विमा कंपनी मार्फत सुरू आहे. तसचे काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत 21 हजार 384 पुर्व सुचनापैकी 14 हजार 454 पंचनामे पुर्ण झाले असुन या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची परिगणना करण्याची कार्यवाही पिक विमा कंपनीस्तरावर सुरू आहे. तसेच पिक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या आधारे अंदाजे 1 लाख 80 हजार शेतक-यांना रक्कम रुपये 70.47 कोटी नुकसान भरपाई देय आहे. परंतु हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीच्या वैयक्तीक पुर्व सुचनेतील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश असल्याने वैयक्तीक पंचनाम्यातील शेतक-यांचा निधी वितरीत केल्यानंतर उर्वरीत देय रक्कम पिक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या आधारे अदा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुग, उडीद व बाजरी या पिकांचा समावेश असल्याची माहिती पिक विमा कंपनीने दिली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.गावसाने यांनी कळविले आहे.
पिक विमा अग्रिम मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा-
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सोलापूर जिल्हयात माहे ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील 92 महसूल मंडळे व 8 तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत पिक विमा कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हास्तरवर झालेल्या आठ बैठकांमध्ये तसेच लेखी पत्राद्वारे वांरवार सूचना देऊन तसेच अपर मुख्य सचिव कृषि विभाग, आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य यांचेशी दुरध्वनीद्वारे तसेच कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पाठपुरावा केला होता. तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता. तसेच जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी ही शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम मिळण्यासाठी पाठपुरावा करत होते.
तसेच सोयाबीन अग्रीम बाबत विमा कंपनीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केलेल्या अपीलातील सर्व मुद्दे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यापूर्वीच खोडून काढलेले होते. या सर्व बाबीमुळे व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओरिएंटल पिक विमा कंपनीस शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देणे अनिवार्य झाले होते.