मुंबई : वृत्तसंस्था
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित कन्नड साखर कारखान्याच्या मालमत्तेवर केलेली जप्तीची कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असून ती राजकीय सूडापोटी करण्यात आली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच ईडीच्या कारवाईमुळे कन्नड साखर कारखाना बंद पडणार नसून शेतकऱ्यांनी आणि बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांनी त्याबद्दल काळजी करू नये, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
यासंदर्भात रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध करून ईडीच्या कारवाईबद्दल त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ईडीने बारामती अॅग्रो कंपनीच्या कन्नड येथील साखर कारखान्याच्या मालमत्तेवर प्रोव्हिजनल जप्ती आणली आहे. परंतु त्या अनुषंगाने कोणताही आदेश अधिकृतरीत्या बारामती अॅग्रो कंपनीला कळवलेला नाही. बारामती अॅग्रो समूहावर लाखो लोक अवलंबून आहेत. त्या सर्व लोकांनाही आश्वस्त करतो की, आपली बाजू ही सत्याची असल्याने न्यायालयात ती आपण सिद्ध करू, त्यामुळे आपणही चिंता करू नये. ईडीने बारामती अॅग्रोविरुद्ध चालू केलेला तपास हादेखील बेकायदेशीर आहे.
ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे अधिकारी व इतरांविरुद्ध एम.आर.ए. मार्ग, मुंबई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाआधारे २०१९ साली स्वतंत्र तक्रार नोंदवली होती. परंतु या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये बारामती अॅग्रो कंपनीचा व माझ्या नावाचा कोणताही उल्लेख किंवा संदर्भ नव्हता. या एफआरआयच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे विभागाने दोनदा तपास करून सप्टेंबर २०२० तसेच जानेवारी २०२४ मध्ये मुंबई येथील फौजदारी न्यायालयात त्याबाबत ‘क्लोजर’ अहवाल दाखल केला आहे, यात या प्रकरणात कोणताही गुन्हा घडलेला नाही, असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. असे असूनदेखील ईडीने बेकायदेशीर रीत्या बारामती कंपनीशी संबंधित मालमत्तेची जप्ती केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.