मुंबई : वृत्तसंस्था
प्रत्येक मुलगा आपल्या आई वडिलांसाठी काही तरी स्वप्न पाहत असतो व त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील करीत असतो. अशाच एका मुलाने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतेच त्याने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला २५ वर्ष पूर्ण केली आहेत. मोठ्या मेहनतीनंतर त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. २००१ मध्ये ‘तुमचा मुलगा काय करतो?’ या नाटकातून सिद्धार्थने रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. यानंतर आता तो पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.
परंतु अभिनेता नव्हे तर निर्माता म्हणूनही तो पदार्पण करणार आहे. सिद्धार्थने आपल्या आई-वडिलांच्या नावाने स्वत:ची नाट्यनिर्मिती संस्था सुरू केली आहे. त्याच्या नाट्यनिर्मिती संस्थेचं नाव ‘ताराराम प्रॉडक्शन्स’ असं आहे. सिद्धार्थच्या आईचं नाव तारा आणि वडिलांचं नाव रामचंद्र असून यावरून त्याने ताराराम प्रॉडक्शन्स हे नाव दिले आहे.
सिद्धार्थच्या पहिल्या नाटकाचे नाव ‘अॅनिमल’ असे आहे. यानिमित्त सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर १५ वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी २०१० मध्ये दोघांनी ‘मी शारुक मांजरसुंभेकर’ या नाटकाचे शतक महोत्सवी प्रयोग केले होते. ‘अॅनिमल’ हे नाटक मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणारे आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, “स्वप्नपूर्ती… ‘ताराराम’ आई-वडिलांच्या नावाने निर्मिती संस्था… महेश मांजरेकर सरांच्या आशीर्वादाने नवीन नाटक…लवकरच…जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!” सिद्धार्थ जाधवने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यावर चाहत्यांसह कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.