नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मी पवारांवर बोलणे योग्य नाही मात्र कुटुंब फोडणाऱ्यांचे, महाराष्ट्र तोडणाऱ्यांचे सत्कार आणि कौतुक आम्ही करत नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला. तसेच ऑपरेशन टायगर करा, लोटस करा मात्र जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्या. पक्ष सोडून जाणारे ‘जय महाराष्ट्र’ नव्हे तर ‘जय गुजरात’ करतात, असे म्हणत ठाकरे यांनी भाजपसह पक्ष सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर खोचक टीका केली. दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. तसेच दलबदलू लोकांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी रात्री आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले. बुधवारी रात्री त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. गुरुवारी अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. दरम्यान, गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. आदित्य ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची सौजन्य भेट होती. दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली. जे जिंकले त्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका मोठी आहे. देशात आणि राज्यात अनेक लोकांना हे निकाल विश्वासार्ह वाटत नाही. मात्र यानिमित्ताने ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी आणि एकूण प्रक्रियेवर अनेक प्रश्न निर्माण होतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.