मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची कुठलीही चौकशी नसल्याची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने जे शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज देण्यात येणार आहे त्याचा आढावा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आतापर्यंत 8 हजार कोटी रिलीज करण्यात आले आहेत. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11 हजार कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. हे पैसे देखील पुढील 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे खात्यात पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दूसरा विषय असा आहे की सध्या शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे. या संदर्भात आपण सगळीकडे नोंदणी सुरू करत आहोत. नोंदणीचे कारण यासाठी की पूर्वी नोंदणी केली नसेल तर व्यापारीच शेतकऱ्यांचा माल कमी पैशात विकत घेऊन सरकारला जास्त पैशांनी विकायचे. म्हणून आता आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतो आणि मग त्यांचा माल खरेदी करतो. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी नोंदणी करावी. व्यापारी हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विका. पण हमीभवापेक्षा कमी भाव व्यापारी देत असतील तर नोंदणी करून सरकारच्या खरेदी केंद्रांवर आपला माल टाका.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचे दाखवले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरे यांनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे, असे प्रदर्शन करू नये, अशी माझी अपेक्षा होती. कारण मला असे वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून उगीच इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाड आणि चुहा भी नहीं निकला, अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे. दुर्दैवाने तेच काल आदित्य ठाकरेंनी केले. त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये.
सोलापूर, तुळजापूर धाराशिव ही जी रेल्वे मार्ग आहेत याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, जवळपास 3 हजार 295 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. 50 टक्के पैसे राज्य सरकार आणि 50 टक्के केंद्र सरकार देणार आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणार आहेच, पण आपल्याला माहीत आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे, त्या दृष्टीने देखील फायदा होणार आहे.