परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्याचे राजकारण देशभर चर्चेत येत असतांना नुकतेच भाजपचे बीडच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी शनिवारी संतोष देशमुख हत्याकांडावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. अजितदादांच्या वादाचे काय झाले? त्यांनी यांना (धनंजय मुंडे) आतमध्ये (मंत्रिमंडळात) का घेतले? त्यांनी बीडमधील संगीत दिघोळेपासून संतोष देशमुखांपर्यंतच्या हत्यांची बेरीज करून हिशेब करावा. या हत्या कुणी केल्या? त्यांचा मास्टरमाइंड कोण? हे त्यांना माहिती नसेल तर त्यांनी आपली माणसे आमच्याकडे पाठवावी. त्यानंतर त्यांना बीडमध्ये अठरा पगड जातींना कोणती वागणूक मिळते हे समजेल, असे ते म्हणाले.
संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मस्साजोग प्रकरण व पीकविमा घोटाळ्यावरून थेट निशाणा साधला. विशेषतः त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावरून त्यांनी अजित पवारांवरही उपरोधिकपणे टीका केली. सुरेश धस यांनी यावेळी क्या हुआ तेरा वादा म्हणत अजित पवारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, अजितदादा, तेरा वादा क्या हुआ रे. काय कू इसको अंदर लिया. ये अंदर लेने जैसा नहीं हैं. तुम्ही संगीत दिघोळेपासून संतोष देशमुखांपर्यंतच्या हत्यांची बेरीज केली तर तुम्हाला हिशेब समजेल. या हत्या कुणी घडवल्या? त्याचा मास्टरमाइंड कोण? कुणी हे उद्योग केले? हे तुम्हाला माहिती नसेल, तर परभणीला तुमची माणसे पाठवा. बारामतीची माणसे आमच्याकडे पाठवा. त्यानंतर तुम्हाला बीडमध्ये अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते हे तुम्हाला समजेल.
रत्नाकर गुट्टे आज या मोर्चाला आले नाही. त्यामुळे ते या प्रकरणी दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सिद्ध होते. त्यांचे हे वागणे चांगले नाही. मी अजित पवारांना प्रकाश सोळंके, राजेश विटेकर यांना मंत्री करण्याची सूचना केली होती. ते ही जमत नसेल तर बुलढाण्याच्या कायंदेला मंत्री करा असे सांगितले होते. आमचा जिल्हा बिनमंत्र्यांचा राहिला तरी काही फरक पडत नाही.