महायुतीचे सर्व, आघाडीचे दोन विजयी : जयंत पाटील पराभूत !
एकूण २७४ आमदारांनी केले मतदान : चौघांचे निधन तर दोघांचा राजीनामा : ७ जण लोकसभेवर अन एक अपात्र
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूकीसाठी शुक्रवार दि. १२ जुलै रोजी मतदान घेण्यात आले. यानंतर साधारण ५ वाजेला मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरा निकाल जाहीर झाला. यात महायुतीचे सर्व ९ उमेदवार तर मविआचे मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे.
भाजप ५, शिवसेना शिंदे गट २, राष्ट्रवादी अजित पवार गट २, शेतकरी कामगार पक्ष १, काँग्रेस १ व उबाठा शिवसेना १ असे १२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर निकालानंतर उत्सुकता संपली आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान २३ मते मिळवणे आवश्यक होते. निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांच्यासह मित्र पक्षाचे सदाभाऊ खोत, शिवसेना शिंदे गटाकडून विदर्भातील कृपाल तुमाने व भावना गवळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे सर्व विजयी झाले.
तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव विजयी झाले. तर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. विधान भवनामध्ये शुक्रवारी सर्व २७४ आमदारांनी मतदान केले. इतर १४ आमदारांपैकी चौघांचे निधन झाले असून ७ जण लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर २ जणांनी राजीनामा दिला असून एक जण अपात्र झाल्यामुळे एकूण २७४ आमदारांचे मतदान होते.
अटीतटीच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे २३ तर शिवाजीराव गर्जे हे २४ मते घेऊन विजयी झाले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडे ४२ आमदार असतानाही त्यांना ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे ही उर्वरित पाच मते कोणाची मिळाली असा प्रश्न निर्माण झाला.
दरम्यान, या निकालानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे जेवढी मतं आहेत, ती मते आम्हाला मिळाली आहे. कोणाकडे किती मते कमी आहे आणि कुणाचे आमदार फुटली, हे थोड्याच वेळात कळेल, या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. पण केवळ ११ उमेदवार निवडून येणार होते. त्यापैकी महायुतीचे संपूर्ण ९ उमेदवार विजयी झाले, असे ते म्हणाले.
या निवडणुकीतील विजयानंतर पंकजा मुंडे यांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. या विजयानंतर मला आनंद झाला आहे. यापूर्वी देशपातळीवर काम केलं आहे. आता राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे, या निवडणुकीत ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.