बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व राजकीय नेत्यांची मोठी अडचण वाढत असतांना आता याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये संदीप क्षीरसागर हे बीडच्या नायब तहसीलदारांना धमकावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित क्लिप ही 2023ची असल्याचे म्हंटले जात आहे.
संदीप क्षीरसागर हे बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करु नको, अशी धमकी देत आहेत. “सहा महिन्यात सरकार आलं की, तू महाराष्ट्रात कुठेही असला तरी तुला सोडणार नाही. तुझे नाटकं मीच बघेन. कुठेही गेला तरी, महाराष्ट्राच्या बाहेर तरी जाणार नाही ना तू?”, असं धक्कादायक वक्तव्य संदीप क्षीरसागर करत असल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये करत आहे. पण ही कथित ऑडिओ क्लिप कितपत खरी आहे? याबाबत दावा केला जाऊ शकत नाही. यावर अद्याप क्षीरसागर यांनीही कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण काय?
संदीप क्षीरसागर : हॅलो…
तहसीलदार डोके : साहेब नमस्कार सर…
संदीप क्षीरसागर : त्या उंब्रज खालसेच्या विषयात तुम्ही त्या रोजगार सेवकाला कशामुळं नोटीस काढली?
तहसीलदार डोके : सर, तक्रार आलेली त्याच्यात…
संदीप क्षीरसागर : कशाची तक्रार त्याची सहीबिही काही नाही.
तहसीलदार डोके : सुनावणी घेतो ना त्याच्यात…त्यानंतर पुढची प्रोसेस करतो.
संदीप क्षीरसागर : डोके, एकतर तुम्ही माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारला घेतलाय बरं का?
तहसीलदार डोके : सर त्यामध्ये तक्रार आलेली आहे, चौकशी तर करावीच लागेल ना?
संदीप क्षीरसागर : नाय नाय… एकतर तुम्ही चार्ज मला न विचारला घेतला…तुम्हाला असं वाटतंय ना…सहा महिन्यात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात कुठंबी असला तरी तुला सोडणार नाही बरं का मी सांगतोय.
संदीप क्षीरसागर : तु माझ्या मतदारसंघात तमाशे करु नकोस बरं का तुला सांगतो.
तहसीलदार डोके : साहेब चौकशी करतो ना…प्रोसेस तर करुन घेतो ना…
संदीप क्षीरसागर : तुझ नाटकं मीच बघून घेईन, कुठ जरी गेलास तरी महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाहीस ना तू ?
संदीप क्षीरसागर : या विषयात त्या रोजगार सेवकाला बिल्कुल अडचण नाही आली पाहिजे…बर का!!
तहसीलदार डोके : करुन घेऊ सर…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यावर क्षीरसागर यांनी ‘शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नव्हते. मारहाण करण्यात येत असलेल्या मॅनेजरला वाचवणारे माझे कार्यकर्ते असून हा व्हिडीओ तीन महिने जुना आहे, असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले होते.