पुणे वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी भाजप–शिवसेना युतीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. विशेषतः पुण्यात निर्माण झालेल्या युतीच्या पेचामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना, मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
पुण्यात युती असल्याचे विधान केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी अर्ज मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, “धंगेकर हे पक्षाची अधिकृत भूमिका मांडणारे व्यक्ती नाहीत. ते महानगरप्रमुख आहेत. पुण्याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मला देखील दिलेले नाहीत.”
उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, पुण्याच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल. त्यानंतरच युतीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या वक्तव्यांना अधिकृत मानू नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पुण्यातील वादावरच सतत चर्चा होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना सामंत म्हणाले, “एका महानगरपालिकेतील बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरवून उपयोग नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पनवेल, कोल्हापूर आणि इचलकरंजीसारख्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप–शिवसेना युती यशस्वी झाली आहे.”