ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीचा जागा वाटप सुनियोजित पद्धतीने होणार !

मुंबई : वृत्तसंस्था

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अत्यंत काळजीपूर्वक, सुनियोजित पद्धतीने जागा वाटप करणार आहे. सर्व घटक पक्षांचे वरिष्ठ नेते २७ फेब्रुवारीला एकत्र येऊन निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) खा. संजय राऊत यांनी दिली. ज्या मतदारसंघात ताकद, तेथे त्या पक्षाचा उमेदवार, असा आघाडीचा फॉर्म्युला असल्याचे राऊत म्हणाले. भाजप ३७० जागा जिंकणार असा दावा केला आहे, याचा अर्थ ३७० जागा जिंकण्यासाठी सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

भाजप महाराष्ट्रात ३२ जागा लढवणार आहे. मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भाजप पदाधिकाऱ्यांच्या
बैठकीत यासंदर्भात चचर्चा झाली. राऊत यांना माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला असता, भाजप एक गँग आहे. या गँगमध्ये अनेक टोळ्या सामील झाल्या आहेत. या टोळीयुद्धावर मला भाष्य करायचे नाही. परंतु अखंड शिवसेना असताना स्वाभिमानने भाजपसोबत २३ जागा लढवल्या. या निवडणुकीतदेखील २३ जागांवर लढणार, असे राऊत म्हणाले. खरी शिवसेना आमची आहे. आम्ही लाचार झालेलो नाही. कोणाच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणार नाही, असे सांगत खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजपबद्दल केलेल्या विधानांवरून राऊतांनी कान टोचले. भाजपची हुकूमशाही मोडीत काढण्यावर एकमत झालेले आहे. त्यामुळे जागावाटपात मतभेद होणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजप लबाडी करत आहे. चंडिगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंद्याप्रमाणे आता महानंदा दूध डेअरीसुद्धा गुजरातला नेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईचा सौदा करत असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!