अंतरवाली : वृत्तसंस्था
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणामुळं जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही त्यांचं उपोषण सुरू होते. मंगळवारी मराठा समाजातील महिलांनी आक्रोश करत मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. इतर नेत्यांनीही तसा आग्रह धरला होता.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ‘सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आरक्षण न दिल्यास आम्ही स्वत: सत्तेत बसून आरक्षण घेऊ,’ असं त्यांनी यावेळी सांगितले.
या सगळ्याचा विचार करून जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, आज सायंकाळी ५ वाजता ते उपोषण सोडणार आहेत. उपोषण मागे घेण्याची घोषणा करताना त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांनी आवाहन केलं. ‘मराठा समाज आरक्षणाची वाट बघतो आहे. स्वत:च्या हातानं तुमचं सरकार पाडू नका,’ असं जरांगे पाटील म्हणाले. सलाईन लावून उपोषण करण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले.
‘मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आाहे. मला काही दिवस विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे दवाखान्यात कुणी येऊ नका. पुन्हा आल्यानंतर आंतरवलीत भेटू. आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. ज्यांनी-ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला आहे, त्यांना सरळ करणार आहे. सुरुवात त्यांनी केलीय, शेवट मराठा समाज करेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.