नागपूर वृत्तसंस्था
काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश केलेले अनिस अहमद अवघ्या पाच दिवसांमध्ये स्वगृही परतणार आहेत. अनिस अहमद यांनी २८ ऑक्टोबरला प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली होती. त्यांनी नागपूरमधून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. परिणामी अनिस अहमद यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागली.
मात्र अवघ्या ५ दिवसांनी अनिस अहमद काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. अनिस अहमद म्हणाले की,’ मी मागील ४४ वर्ष काँग्रेसचं काम करतोय, मी पक्ष सोडला नाही, मी काँग्रेसमध्ये असताना दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म आणला. काही तांत्रिक कारणाने मी वेळेत अर्ज दाखल करू शकलो नाही. पण मी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना मानणारा आहे.’
अनिस अहमद हे कांग्रेसचे माजीमंत्री राहीले आहेत. शिवाय ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव देखील राहिले आहे .अनिस अहमद यांनी यापूर्वी आमदार म्हणून दोन वेळा मध्य नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे.
अनिस अहमद यांनी मध्य नागपुरातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती पण गेल्यावेळी फक्त चार हजाराने पराभूत झालेले अ. भा. युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे अहमद नाराज होते.