अन्नछत्र मंडळ वाहनतळ ते सोलापूर – मैंदर्गी बायपास जोड रस्त्याला लवकरच मंजुरी
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ ते सोलापूर – मैंदर्गी बायपास रस्ता करण्याच्या दृष्टीने आपण सकारात्मक असून लवकरच या रस्त्याला मंजुरी देऊ आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करू. हा रस्ता रुंद करण्याबरोबरच तो मजबूत करण्यावर आपला विशेष भर राहील,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.गुरुवारी, काही स्थानिक पत्रकार तसेच स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे यांनी यांची पाहणी केली होती.त्यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी रस्त्याबाबत तातडीने पावले उचलावेत आणि हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती.यानंतर शनिवारीच आमदार कल्याणशेट्टी व भोसले यांच्यामध्ये या विषयावर सविस्तरपणे चर्चा झाली. त्यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी या रस्त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करू आणि येत्या सहा महिन्यात हा रस्ता आपल्याला झालेला दिसेल,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.केंद्र असेल किंवा राज्य सरकारकडून याला आपण मोठा निधी उपलब्ध करून घेऊ.हा जुना डीपी रस्ता आहे.वास्तविक पाहता आम्ही हद्दवाढ भाग नगर परिषदेत समाविष्ट करून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे.
त्यावेळी तर तो होईलच पण तत्पूर्वी तो कसा लवकर करता येईल यादृष्टीने तातडीने निर्णय घेतला जाईल,असेही ते म्हणाले.श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास होणार नाही.त्यासाठी आपले अनेक प्रयत्न चालू आहेत.या रस्त्याचे अंतर तर
केवळ दीड ते पावणेदोन किलोमीटर आहे. हा रस्ता झाल्यास अक्कलकोट शहरातील वाहतूक कोंडी ६० ते ७० टक्क्यांनी कमी होणार आहे.दर्शन घेऊन भाविक अन्नछत्र पासून बायपासला गेल्यास तो सोलापूर किंवा गाणगापूर या दोन्ही रस्त्याकडे तो जाऊ शकेल.गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोटमध्ये वाहनांची वाढती गर्दी प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय बनला आहे.येथील स्थानिकांना देखील याचा प्रचंड त्रास होत आहे.हा रस्ता लवकर करावा,अशी तेथील स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. त्यामुळे या रस्त्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.हा विषय आमदार कल्याणशेट्टी यांच्या कानावर घालताच तातडीने त्यांनी रस्ता करून देण्याचे निर्णय घेतला आहे.यावेळी माजी नगरसेवक महेश हिंडोळे, आनंद तानवडे, मिलन कल्याणशेट्टी, नन्नू कोरबू, अविनाश मडीखांबे आदी उपस्थित होते.