अक्कलकोट प्रतिनिधी : सलग सुट्ट्यांमुळे पुणे, मुंबईसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटला दाखल झाले होते. या वाढत्या गर्दीचा विचार करून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अन्नछत्र मंडळातील कर्मचारी व सेवेकरी रात्रंदिवस कार्यरत होते. सलग सुट्ट्यांमुळे अन्नदानाची वेळ वाढविण्यात आली होती. श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे गेल्या दहा दिवसांत १२ लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून, सरत्या वर्षात भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे चित्र दिसून आले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची व्यवस्था असून ही सेवा भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीतून चालवली जाते. दररोज सरासरी २५ हजारांहून अधिक भाविक महाप्रसाद घेतात, तर सण, उत्सव, प्रत्येक गुरुवार, संकष्टी चतुर्थी, एकादशी, गुरुपौर्णिमा तसेच सलग सुट्ट्यांच्या काळात ही संख्या एक लाखांच्या पुढे जाते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत अन्नछत्र मंडळ परिसरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर येथील विविध रक्तपेढ्यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरांमध्ये शेकडो स्वामी भक्तांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श ठेवला.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी न्यासाकडून नेटके नियोजन करण्यात आले होते. मैंदर्गी, बासलेगाव रोड तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन मैंदर्गी रस्त्यावरील गेटमधून बाहेर जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला. तसेच पार्किंगची स्वतंत्र व शिस्तबद्ध व्यवस्था केल्यामुळे वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि भाविकांना सुखकर पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेता आला.
दरम्यान, नव्याने उभारण्यात येणाऱ्या भव्य महाप्रसादगृहाचे काम प्रगतीपथावर आहे. सन २०२४ च्या गुरुपौर्णिमेला या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ झाला असून ही इमारत पूर्णतः वातानुकूलित व मंदिरसदृश्य असणार आहे. सुमारे १ लाख १९ हजार ३९८ चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फूट उंच, भव्य व आकर्षक मूर्ती उभारण्यात येणार असून, नव्या महाप्रसादगृहात एकाच वेळी २,५०० भाविकांची भोजन व्यवस्था असणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता न्यासाकडून केलेले हे सर्वंकष नियोजन आणि सुविधा अक्कलकोटमध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी दिलासादायक ठरत आहेत.