मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून कॉंग्रेसला एकापोठापाठ एक धक्के बसत असतांना आता काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर अखेर हात सोडून धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे निश्चित झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोलीत मोठा मेळावा घेऊन शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेस मागील काही वर्षापासून गटा तटाच्या राजकारणाने चांगलीच चर्चेत आली आहे.
माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा गट तर विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा गट असे दोन गट पडले आहेत. त्यासोबतच तत्कालीन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचाही एक गट हिंगोली जिल्हयात कार्यरत आहेत. या गटा तटाच्या राजकारणावरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्नच झाले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्हयात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे.
त्यातही महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विधान परिषद सदस्या डॉ. सातव यांनी महाविकास आघाडीचे काम केले नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षातही वादाला तोंड फुटले होते.
दरम्यान, हिंगोली विधानसभेवर मजबूत पकड असलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत पक्षा विरुध्दच बंडखोरी करून अपक्ष निवडणुक लढविली होती. मात्र पक्षातीलच काही तथाकथीत नेत्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला. ्त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीलाही त्यांनी कंटाळून त्यांनी धनुष्यबाणी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी त्यांच्या समर्थकांची बैठकही घेतली असून त्यातही शिंदेसेनेतच प्रवेश घेण्याचा सुर निघाला आहे. त्यामुळे आता माजी आमदार गोरेगावकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हिंगोली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेऊन त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे हिंगोली विधानसभेत शिंदेसेनेला मोठे बळ मिळणार असल्याचे राजकिय वर्तुळातून बोलले जात आहे.