ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत काय? विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा हल्लाबोल

मुंबई, दि. १८ ऑक्टोबर – भाजपमध्ये सर्व उपरे भरल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. तुमच्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपमधील उपऱ्यांची संख्या एकदा जनतेसमोर येऊ द्या, असं आव्हान देतानाच आजच्या मंत्रिमंडळात कोण आहेत? उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत काय? उर्मिला मातोंडकर कोण आहेत? या लोकांनी शिवसेनेसाठी कधी आंदोलने केली आहेत का? मग इतरांना उपरे म्हणणं कितपत योग्य आहे? असा सवाल आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,सत्ता टिकली पाहिजे म्हणून राष्ट्रवादीला प्राधान्य द्याव लागतं त्यामुळे आज जे शिवसैनिक आहे त्यांना आपण पद देत नसून त्यांचे मन दुखावत आहात. पंढरपूरला समाधान अवताडे शिवसैनिक होते, त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे तिकीट देता आलं नाही. पण समाधान अवताडे यांना भाजपने आमदार केले. सुभाष साबणे कडवट शिवसैनिक होते ज्यांनी अनेक वर्ष शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, परंतु त्यांनाही तिकीट आपण देऊ शकला नाही. कॉँग्रेसला उमेदवारी देण्यासाठी व राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी त्यांना उमेदवारी देता आली नाही. त्यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांना न्याय दिला आणि म्हणूनच शिवसेनेत ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय देण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे आपल्यात किती उपरे आहेत ही आकडेवारी आपण जाहीर करावी असा खोचक टोलाही दरेकर यांनी लगावला.

सत्तेपोटी त्यांच्या मतांकडे बघायला वेळ नाही

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं मत विचारात घ्या अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली, पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहे, पक्षांतर्गत काही मत असेल तर पक्ष पातळीवर विचारात घेऊ पण आज कॉँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावल्यानंतर शिवसेनेचे नेते, आमदार, खासदारांमध्ये जी नाराजी आहे, अस्वस्थता आहे त्यांच मत जर विचारात घेतलं तर शिवसैनिकांसाठी ते हिताचे ठरेल असा टोला दरेकर यांनी लगावला असून ते म्हणाले, शिवसेना नेते अनंत गीते यांनी काय भूमिका मांडली, याकडे आपण लक्ष दिलं का ? आज गीते यांच्यासारखा नेता आपली भूमिका मांडतो त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यावर चर्चा मंथन करायला वेळ नाही परंतु पंकजा मुंडे काय बोलली याचे उसने अवसान घेऊन वक्तव्य करायला वेळ आहे. रामदास कदम यांनी काय भूमिका मांडली, प्रताप सरनाईक असो वा परभणीचे बंडू जाधव यांनी काय नाराजी व्यक्त केली याकडे आपण लक्ष दिलं का ? तसेच कालचं हेमंत पाटील यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून घेतलेली भूमिका यासंदर्भात आपण वक्तव्य केलं का ? त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात काय अस्वस्थता आहे, याकडे आधी लक्ष द्या.पण सत्तेपोटी आज शिवसैनिकांच्या मतांकडे बघायला आपल्याकडे वेळ नाही असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!