बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि धर्मकारणात एकमेकांशी नाते असलेच पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मकारणात हस्तक्षेप करू नये. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून माहीत आहे की दर वेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण बघा, सगळे जग बघत आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, भगवान बाबा यांच्याविषयी माझ्या मनात काय आहे हे मी शब्दांत कधीच सांगू शकणार नाही. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला भगवान बाबांचे साक्षात दर्शन होते. त्यांच्या पवित्र स्मृती आहेत. आम्ही त्यांना पहिले नाही. पण त्यांच्या कहाण्या आज आपण ऐकतो. स्वतःला सत्व तत्व इतके पाळले, स्वतःचे सत्व सिद्ध कार्यासाठी त्यांनी एवढा त्याग केला. त्यांच्या मनात कधी सुद्धा स्वार्थ नव्हता. तसेच आमच्या मीराआई साहेब आहेत.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, लोक मला विचारतात तुम्ही जिथे जातात तिथे तुमचेच लोक फुले घेऊन स्वागतासाठी तयार असतात का? काहींना असेही वाटत असते. पण मी म्हणते मलाच माहीत नसते माझ्या स्वागतासाठी कोण एवढी तयारी करतं. मी तर नेहमी म्हणत असते की जेसीबीने फुले नका उधळू. आता मी रागावले म्हणून फटाके फोडणे बंद केले. पर्यावरण मंत्री समोर फटाके उडवून पर्यावरणाची वाट लावता का?, असा मिश्किल सवालही त्यांनी केला.