मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी देणारे प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर सुनावणीला हायकोर्टात सुरुवात झाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या जामिनाला विरोध दर्शवला असून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणीपूर्वीच कोरटकर मुंबईत दाखल झाला आहे. पण तो कोर्टात हजर झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.स्थानिक कोर्टात आमची बाजू ऐकूण घेतली जात नाही असे सरकारी वकीलांनी म्हटले असून दुपारी कोल्हापूर कोर्टात सुनावणी आहे. तिथे आमची बाजू ऐकून घेतली जावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.
प्रशांत कोरटकर यांचा जामीन आज संपत आहे, त्यामुळे जामीन रद्द करण्याची गरज नाही असे कोर्टाने म्हटले आहे. तर कोल्हापूर कोर्टाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेत योग्य तो निर्णय घ्यावा असेही कोर्टाने म्हटले आहे. तर कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाका असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने देत कोरटकरला मोठा झटका दिला आहे. प्रशांत कोरटकरचा मोबाईल हॅक झाला होता असे निरीक्षण कोल्हापूर कोर्टाने नोंदवले होते. हे काढून टाकावे असे निर्देश कोर्टाने दिले आहे.
दरम्यान वकील असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर हा विषारी माणूस आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आली पाहिजे. मी जेवढे त्याला ओळखतो तितका सावंत यांना धमकी देणारा आवाज त्याचाच आहे. मोबाईल देताना त्यामधील डाटा डिलीट करण्यात आला आहे. हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.
असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकाराने भ्रष्ट मार्गाने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, हे पुढे आले आहे. तो ज्या विचारधारेशी निगडीत आहे, तसे त्यांने इंद्रजित सावंत यांना फोन करत बोलले. ते रेकॉर्ड व्हायरल झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे वक्तव्ये त्याने केले आहेत.
असीम सरोदे म्हणाले की, कोरटकरने सावंत यांना फोन करत जे वक्तव्य केले आहे ते जर पाहिले तर भयानक स्वरुपाचे आहेत, तरी अर्ध्या तासात त्याला अटकपूर्वक जामीन मिळतो कसा? सरकारनेदेखील अर्ज केला होता की त्याचा जामीन रद्द करा. ज्या अटींवर त्याला जामीन मिळाला होता त्यातील अनेक गोष्टीचे त्याने पालन केल नाही म्हणून त्याचा जामीन रद्द करण्यात यावा. कोल्हापूरच्या पोलिस स्टेशनला हजर होणे ही त्यातील पहिली अट होती पण कोरटकर हजर झाला नाही. तर दुसरी अट होती की पोलिस स्टेशनला मोबाईल जमा करावा पण त्याने पत्नीच्या हाती मोबाईल पाठवला.