पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार पक्षप्रवेश सुरु असतांना आता काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. माझी कोणावरही नाराजी नाही, काँग्रेसने प्रेम दिले त्यासाठी मनापासून आभार, पक्ष सोडताना दु:ख होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चेनंतर तारीख ठरवणार आहाेत असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी व्हाट्सअपला स्टेटस ठेवत सगळ्यांच्या नजरा खिळवल्या आहेत. गळ्यात भगवा परिधान करून धंगेकर यांनी ‘शहा का रुतबा’ हे गाणे त्याला लावले होते. यामुळे ते पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी माझ्या मतदारांशी आणि सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत हा निर्णय घेतला आहे. गेली 10 ते 12 वर्षे मी काँग्रेससोबत काम केले आहे. तिथे माझे कुटुंब तयार झाले आहे. विधानसभा असो की लोकसभा सर्वांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. माझा पराभव झाला ही गोष्ट वेगळी आहे, पण त्यासाठी अनेकांनी कामं केली आहेत. त्या सर्व कार्यकर्त्यांची काम व्हावे यासाठी सत्ता असणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय काम होत नाही.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी कामानिमित्त मागे दोन 3 वेळा भेटलो होतो. उदय सामंत यांची आणि माझीही भेट झाली. त्यांनी मला सांगितले की तुम्ही आमच्यासोबत काम करा. या बातम्यादेखील माध्यमांनी दाखवल्या. मी मतदारांशी चर्चा केली त्यांनी मला सांगितले की काम तर करावेच लागणार आहे, म्हणून मी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी आमदार असताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांनी मला नेहमीच सहकार्य केले आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचा चेहराा आहे त्यांच्यासोबत काम करावे अशी मी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांना मी विधान परिषद किंवा म्हाडाचे अध्यक्षपद मागितलेले नाही.