ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे गटाला मोठा धक्का; तिकीट नाकारल्याने बड्या महिला नेत्येचा भाजपात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : मुंबईत सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. तिकीट न मिळाल्याच्या नाराजीमुळे पक्षाच्या बड्या महिला नेत्येने ठाकरे गटाला रामराम ठोकत थेट भाजपात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे ठाकरे गटातील असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तसेच मुंबई सिनेटच्या सदस्य शीतल देवरुखकर यांनी उल्हासनगर येथे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शीतल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या ५१ क्रमांकाच्या वॉर्डमधून इच्छुक उमेदवार होत्या. निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारीही केली होती, मात्र ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या.

तिकीट वाटप प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करताना देवरुखकर म्हणाल्या की, “तिकीट वाटपाच्या वेळी माझे फोन उचलले गेले नाहीत, मेसेजेसलाही उत्तर मिळाले नाही.” या वागणुकीमुळेच आपण ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, शीतल देवरुखकर यांच्या पक्षांतरामुळे ऐन महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकीत त्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत असून, या घडामोडीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे आणखी बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!