हिमाचल वृत्तसंस्था : राज्यातील सोलन जिल्ह्यातील नालागढ पोलीस स्टेशनच्या परिसरात आज भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यालगतच्या एका गल्लीमध्ये हा स्फोट झाला असून, स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की त्याचा आवाज तब्बल ४०० ते ५०० मीटरपर्यंत ऐकू आला. या स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या असून, जवळच असलेल्या आर्मी हॉस्पिटललाही मोठा फटका बसला आहे. हॉस्पिटलच्या खिडक्यांच्या काचा तुटून रस्त्यावर पडल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य पुरावे नष्ट होऊ नयेत आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांना घटनास्थळी जाण्यास कडक मज्जाव करण्यात आला असून, पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे.
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मालमत्तेचेही मोठे नुकसान टळले आहे. घटनेनंतर बद्दीचे एसपी विनोद धीमान यांच्यासह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, स्फोट नेमका कशामुळे झाला, तो अपघाती की घातपाती, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा स्फोट अत्यंत जोरदार होता आणि अचानक झालेल्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.