नागपूर : वृत्तसंस्था
देशासह राज्यातील अनेक निवडणुकीत कॉंग्रेसला अनेक धक्के बसले असतांना आता दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात संघटनात्मक बदल करण्याच्या पवित्र्यात आहे. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, सतेज पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपुर्वी पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांना संधी दिल्या जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः या संदर्भात माध्यमांशी बोलताना संकेत दिले. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळवून देण्यात आणि उमेदवार निवडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पटोले यांच्यावर विधानसभा निवडणुकीत पक्षाने जबाबदारी दिली होती. पण महाविकास आघाडीत काँग्रेसला समाधानकारक जागा पदरात पाडून घेता आल्या नाहीत. केवळ १६ जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. अद्याप विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर पराभवाची जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी नैतिकदृष्ट्या आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव हाय कमांडकडे दिला. मात्र, त्यांना अभय देण्यात आले.
आता मात्र लवकरच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, गटनेते पदावर नेमणूक होणार असल्याची माहिती आहे. एकीकडे मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण प्रकरणात विदेशात जाणारे विमान रोखून त्याची सुटका केली जाते. मात्र, दुसरीकडे संतोष देशमुख हत्या, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मंत्रालय आणि डीजी ऑफिसमधून कारभार सुरू असल्याचा, सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. आका म्हणून वारंवार उल्लेख होऊनही मंत्र्यांचा बचाव सरकार करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत आहेत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांची खरे तर जीभ कापली पाहिजे. अनेक मंत्री सातत्याने महापुरुषांचा अपमान करीत असल्याचा संतापही पटोले यांनी व्यक्त केला.