नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा उद्या, शनिवारी निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद लाइव्ह दाखवण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसह ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुका सात ते आठ टप्प्यांत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर पूर्ण आयोगाची बैठक झाली. ही बैठक जवळपास ४५ मिनिटे चालली.
निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात करावे लागेल, याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते. याव्यतिरिक्त किती टप्प्यांत निवडणूक कार्यक्रम घ्यायचा आहे? कोणत्या राज्यांत आधी आणि कोणत्या राज्यांत नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.