सोलापूर : प्रतिनिधी
देशातील काही ठिकाणी मागील महिन्यापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की, सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी 11.22 वाजता पृथ्वी हादरली. भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल होती. म्हणजेच सुदैवाने हे धक्के सौम्य होते. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता.
याआधी मंगळवारी (1 एप्रिल) भारताच्या पूर्वेकडील कोलकाता आणि इंफाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याच वेळी, नेपाळमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपाचे धक्के बिहार, सिलीगुडी आणि भारताच्या इतर आसपासच्या भागातही जाणवले होते. 2 एप्रिलला सिक्कीमच्या नामचीमध्ये आणि त्याआधी १ एप्रिलला लेह लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 31 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग आणि शी योमी आणि सिक्कीमच्या गंगटोकमध्ये भूकंप झाला होता. 30 आणि 31 मार्चला सलग दोन दिवस गंगटोकला भूकंपाचा धक्का बसला होता.
29 मार्च रोजी हरियाणा तील सोनिपतमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. 29 मार्च रोजी दुपारी 2:08 वाजता 2.3 तीव्रतेने पृथ्वी हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खाली होता. गेल्या सोमवारी, 1 एप्रिल रोजी दुपारी 2:38 वाजता अरुणाचल प्रदेशात लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.5 एवढी होती. सुदैवाने भूकंपामुळे फारशी हानी झाली नाही. मात्र, म्यानमारमध्ये झालेल्या विध्वंसामुळे भारतातील लोकांमध्येही मोठा भूकंप होण्याची भीती आहे.