मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे आजारी आहेत. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलताही येत नव्हते. त्यांनी स्वत: ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्याने भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली आहे. तसेच त्यांना बेल्स पाल्सी आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या या कठीण काळात त्यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात गंभीर आरोप झाले. तसेच त्यांचा जवळचाच व्यक्ती या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. या प्रकरणातील फोटो समोर आल्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती.