मुंबई : वृतसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आंदोलन करीत असतांना आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझ्यापुढे उपस्थित केलेला त्यांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा येत्या 23 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले की, आज मी मनोज जरांगे पाटलांशी सर्वांसमोर चर्चा केली. मी बीडला एका कार्यक्रमाला जात होतो. मला रस्त्यात कळले की, ते शहागड येथील कार्यालयात आहेत. त्यांनी सामाजिक कामासाठी कार्यालय सुरू केले आहे. माझे व त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी येथे आलो. आज त्यांच्यासोबत जी काही भेट झाली, ती सर्वांपुढे झाली. ती कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहे. याशिवाय दुसरी कोणतीही चर्चा आमच्यात झाली नाही. त्यांनी सामाजिक स्तरावरील दोन-तीन मुद्दे सांगितले. त्यावर मी व खासदार संदिपान भुमरे 23 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. ज्या गोष्टी लवकरात लवकर करण्यासारख्या आहेत, त्या लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. हीच विनंती व सूचना त्यांनी केली आहे.
सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या अजूनही पूर्ण केल्या नाहीत, अशी बाब यावेळी पत्रकारांनी उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले की, जरांगे यांनी त्यांची भावना माझ्याकडे बोलून दाखवली आहे. आज 23 तारीख आहे. त्यांच्या उपोषणाला 30 तारखेला 3 महिने होतील. शासनाचा प्रतिनिधी आहात. तुम्ही माझ्या कार्यालयात भेटण्यासाठी आला असला तरी मी सामाजिक काम करणारा माणूस आहे. माझा हा निरोप, विनंती किंवा सूचना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला असे ते म्हणालेत. यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे होणारी कामे लवकरात लवकर व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही सर्वजण करू.