नाशिक : वृत्तसंस्था
बीड येथील सरपंच खून प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आज (दि.5) स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहिली असून मंत्रिपदही वाचले आहे.
1995 मधील हे प्रकरण आहे. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतील दहा टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती. या सदनिका लाटण्यासाठी त्यांनी कागदपत्रांत फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर सरकारवाडा पोलिसांत कोकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 29 वर्षांनी या प्रकरणात नाशिक कोर्टाने निकाल दिला. त्यात दोषी आढळल्याने कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला खालच्या कोर्टाने २ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयात त्यासंदर्भात आज सुनावली झाली, कोर्टाने कोकोटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळू नये यासाठी शरद शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. तसेच लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्त्व रद्द होते. कायद्यानुसार कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांना आमदारकी व मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले असते. त्यामुळेच सत्र न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. मात्र, शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची आमदारकी वाचली असून सध्यातरी मंत्रिपदावरील टांगती तलवार हटली आहे.