पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण मोठे चर्चेत येत असतांना आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी नामांकित ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे. ललित पाटील ज्या वार्ड क्रमांक 16 या कैद्यांच्या वॉर्डमध्ये दाखल होता त्याची जबाबदारी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते ( वय -40) यांच्यावर होती आणि त्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे ड्रग तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या संदर्भात भादवी कलम 223,224,225,120(ब),201,34 गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा चौकशीत ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांचा देखील सहभाग चौकशीत निष्पन्न झाले, त्यामुळे त्यांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी ससून रुग्णालयातील हाय प्रोफाईल शिपाई कर्मचारी महेंद्र शेवते याला देखील पोलिसांनी अटक केलेली होती. तसेच ससून रुग्णालयातील कारागृहाचा शिपाई मोईस शेख याचा देखील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास गजाआड करण्यात आले.
नुकतेच शेख याला कारागृह सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देखील काढण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ससून रुग्णालयातील कॅन्टीनचा कर्मचारी रौफ शेख याला देखील पोलिसांनी अमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्याच सोबत ससून रुग्णालयातील नियुक्तीस असलेल्या दोन अधिकाऱ्यांसह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील निलंबन करण्यात आलेले आहे. या सर्व प्रकारामुळे ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 16 मध्ये नेमके कशाप्रकारे अवैध धंदे गुन्हेगारांच्या मार्फत फोफावले होते हे निष्पन्न होऊ लागले आहे.