ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एका चिमुकल्याच्या चिठ्ठीमुळे भाजपचा विजय हुकला अन शिंदे गट झाला विजयी

पुणे वृत्तसंस्था : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये लोकशाहीचा एक अनोखा आणि थरारक क्षण अनुभवायला मिळाला. मतमोजणीअंती दोन प्रमुख उमेदवारांना समान मते मिळाल्याने अखेर चिठ्ठी काढून निकाल जाहीर करावा लागला आणि एका चिठ्ठीने नगरसेवक ठरल्याची दुर्मिळ घटना घडली.

प्रभाग क्रमांक ३ मधील ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती. महायुतीमध्ये एकत्र असले तरी स्थानिक राजकारणात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. शिवसेनेकडून लक्ष्मण मारुती पारधी तर भाजपकडून ज्योती संदीप बाणखेले रिंगणात होत्या. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार करत विकास, जनसंपर्क आणि स्थानिक मुद्द्यांवर भर दिला होता.

मतमोजणीच्या अंतिम फेरीत उत्कंठा शिगेला पोहोचली. निकाल जाहीर होताच सर्वांनाच धक्का बसला, कारण दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २२३ मते मिळाली होती. पुनर्मोजणी करूनही निकालात कोणताही फरक न पडल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. अखेर निवडणूक नियमांनुसार चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्याचा मार्ग अवलंबण्यात आला.

दोन्ही उमेदवारांच्या नावांच्या चिठ्ठ्या तयार करून एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी उचलण्यात आली. संपूर्ण मोजणी केंद्रात तणावपूर्ण शांतता पसरली होती. त्या चिठ्ठीवर ‘लक्ष्मण मारुती पारधी’ हे नाव वाचताच शिवसेना समर्थकांमध्ये आनंदाचे उधाण आले, तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशा दिसून आली.

विजयानंतर लक्ष्मण पारधी भावूक झाले. “मतदारांनी मला समान मतांनी स्वीकारले आणि नियतीनेही मला साथ दिली,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंचर नगरपंचायतीच्या इतिहासात चिठ्ठीने नगरसेवक ठरण्याची ही पहिलीच घटना ठरली असून, या अनोख्या निकालाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!