मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच भाजपची देखील अनेक ठिकाणी बैठकीचे सत्र सुरु आहे. भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बदल होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत कोणताच निर्णय झालेला नसल्याची माहिती अशी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.
भाजपमध्ये संघटनात्मक कोणताच बदल होणार नसल्याचे त्यांना स्पष्ट केले. राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. तो सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती शेलार यांनी दिली. येणाऱ्या दहा तारखेपर्यंत भरगच्च कार्यक्रम घेऊन भाजप सर्व मतदारांपर्यंत पोहोचणार असल्याचे आमदार शेलार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीनंतर आता पुढील काही महिन्यातच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत यामध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
सहकारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. तसेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. महायुतीच्या नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस हे बोलणी करणार असल्याची माहिती देखील आशिष शेलार यांनी दिली. महायुतीचा अर्थसंकल्प हा थेट मदत करणारा असल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.