नागपूर : वृत्तसंस्था
भाजपतर्फे ४ फेब्रुवारीपासून व्यापक जनसंपर्क वाढवण्यासाठी गाव चलो अभियान राबवले जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत भाजप पोहोचणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील पक्षाचे सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार याअंतर्गत गावात एक दिवस मुक्काम करणार असल्याचे ते म्हणाले.
बावनकुळे पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या दहा वर्षांतील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेतले आहे. मोदी सरकारच्या योजना आणि उल्लेखनीय कामगिरीची गॅरंटी देणारी पत्रके यावेळी वितरित केली जाणार आहेत.
अभियानाअंतर्गत ५० हजार युनिट्समध्ये भाजपचे ५० हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प. सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी राज्यभरातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील. ३२ हजार सुपर वॉरियर्सचे त्यांना सहकार्य मिळेल, असे बावनकुळे म्हणाले. प्रत्येक युनिटमध्ये भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा, अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे केली जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले.