सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर-विजयपूर महामार्गावरील ‘जाई-जुई’ हे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे जुने घर असलेला प्रभाग क्रमांक २३ यंदाच्या महापालिका निवडणुकीत विशेष चर्चेचा ठरला. या प्रभागात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. मात्र निकालात भाजपने महाविकास आघाडीचा अक्षरशः सुफडा साफ करत मोठा राजकीय धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने दीपाली शहा (काँग्रेस), अलका राठोड (शिवसेना ठाकरे गट), लक्ष्मण जाधव उर्फ काका (ठाकरे गट) आणि सुनीता रोटे (राष्ट्रवादी – तुतारी) हे उमेदवार मैदानात होते. मात्र भाजपच्या पॅनलने सर्वच उमेदवारांचा भरगोस मतांनी पराभव केला.
काँग्रेसच्या दीपाली शहा यांचा भाजपच्या आरती वाकसे यांनी पराभव केला. शिवसेना ठाकरे गटाकडून लढणाऱ्या माजी महापौर अलका राठोड यांना भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर यांनी पराभूत केले. नुकतीच ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या अलका राठोड यांचा पराभव हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कैकाडी समाजातील प्रतिष्ठित नेते आणि दोन वेळा नगरसेवक राहिलेले लक्ष्मण जाधव उर्फ काका यांनाही भाजपचे राजशेखर पाटील यांनी पराभूत केले. या निकालामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्या राहत्या प्रभागातच भाजपने वर्चस्व सिद्ध केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या विजयामुळे सोलापूर महापालिकेत भाजपची ताकद अधिक भक्कम झाली असून, महाविकास आघाडीला हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.