ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रवरा नदीत बोट उलटली : तिघांचा मृत्यू

अहमदनगर ; वृत्तसंस्था

जिल्ह्यातील प्रवरा नदित राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची बोट उलटल्याची घटना घडली आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या 2 तरुणांचा शोध घेण्यासाठी ही बोट गेली होती. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. प्रवरा नदीत बुधवारी दोन तरुण बुडाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. या दरम्यान SDRF चीच बोट उलटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी प्रवरा नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. यांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. याच शोधकार्यासाठी आज एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. अकोले तालुक्यातील सुगाव गावजवळ ही शोधमोहिम सुरू होती. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता.

दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बोटीमधील इतर दोघांचा शोध सुरू आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!