मुंबई : भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्याचा महाराष्ट्र विधानसभेचा ठराव सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याप्रकरणी भाजपकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या सुनावणीचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचा निलंबनाचा ठराव रद्द केल्याने भाजपच्या १२ आमदारांना दिलासा दिला आहे.
यापूर्वीही सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली होती. “एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई म्हणजे ही आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली ही शिक्षा आहे,” असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. वर्षभरासाठी आमदारांचं केलेलं निलंबन असंविधानीक आणि मनमानी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.