बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील भाजपचे आ.सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. आ.धस म्हणाले कि, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह करू नये, असे विधान आता त्यांच्या अंगाशी येणार असल्याचे दिसत आहे. सुरेश धस यांच्या विधानावर सूर्यवंशी कुटुंबीयांनीही प्रतिक्रिया दिली. जर तुमच्या घरचा कोणी व्यक्ती गेला असता तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केले असते का? असा संतप्त सवाल सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी सुरेश धस यांना केला. सर्व दोषी पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्युच्या निषेधार्थ दलित संघटनांकडून परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्यात आला होता. मात्र, हा लॉन्ग मार्च नाशिकमधूनच माघारी फिरला. भाजप आमदार सुरेश धस आणी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हा मार्च स्थगित करण्यात आला. यावेळी आंदोलकांशी बोलताना सुरेश धस यांनी पोलिसांची डिपार्टमेंटने चांगलीच कान उघडणी केली आहे. त्यामुळे गुन्हे दाखल व्हावे हा आग्रह धरु नये, अशी विनंती केली होती. यानंतर सोमनाथची आई विजयबाई सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत सूर्यवंशी कुटुंबीयांची भूमिका स्पष्ट केली.
आमदार सुरेश धस हे गरीबांचे कैवारी म्हणून मिरवतात मात्र ते तर गुंडाचे कैवारी झाल्याचे दिसत आहे. सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ करा असे सुरेश धस कसे काय म्हणू शकता? तुमच्या घरातील कोणी व्यक्ती गेला असता, तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केले असते का? असा संतप्त सवाल विजयबाई सूर्यवंशी व भाऊ अविनाश सूर्यवंशी यांनी सुरेश धस यांना केला.
तुम्ही आम्हाला मन मोठे करा म्हणता, पण आमचे मन छोटेच आहे, आम्ही गुन्हेगारांना अजिबात माफ करणार नाही. तुमचे चुकीचे बोलणे सहन करणार नाही. माझ्या पोटचे लेकरू गेले आहे. माझे लेकरू परत आणून देऊ शकता का? असा सवाल करत मी कोणत्याही पोलिसाला माफ करणार नाही, त्यांना मोकळे सोडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.